Kevil Patil
५४ गाळ्यांवर निष्कासनाची टांगती तलवार; बोईसरमध्ये आजपासून गाळे रिकामे
पोलीस बंदोबस्त मिळाल्यास ९ सप्टेंबरला कारवाई; संभाव्य कारवाईपूर्वीच व्यावसायिकांकडून गाळे रिकामे करण्यास सुरुवात
बोईसर (जिल्हा प्रतिनिधी केविल पाटील) : बोईसर रेल्वे स्थानक परिसरातील गट क्रमांक १०० मधील ५४ व्यावसायिक शेडवर बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी निष्कासनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यास नियोजित कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी दिली. त्यामुळे या संभाव्य कारवाईकडे बोईसरसह पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
परवानगीविना उभारलेल्या शेडवर कारवाईचे आदेश
संबंधित व्यावसायिक शेड सक्षम प्राधिकाऱ्यांची आवश्यक परवानगी न घेता उभारण्यात आल्याचे प्रशासकीय चौकशीत स्पष्ट झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पालघर तहसीलदारांनी १७ जुलै २०२५ रोजी संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या.
चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी ५४ गाळे निष्कासित करण्याचे अंतिम आदेश तहसीलदारांनी दिले. त्यानंतर या आदेशाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली.
न्यायालयीन आव्हानानंतरही दिलासा नाही
तहसीलदारांच्या निष्कासन आदेशाला संबंधित व्यावसायिकांनी न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयीन प्रक्रियेनंतरही अपेक्षित दिलासा न मिळाल्याने संबंधितांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्याचे सांगण्यात येते. उच्च न्यायालयातही संबंधितांचा दावा फेटाळण्यात आल्याने प्रशासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
कारवाईच्या शक्यतेने गाळे रिकामे करण्यास सुरुवात
दरम्यान, संभाव्य निष्कासन कारवाईची माहिती मिळताच काही व्यावसायिकांनी मंगळवारपासूनच गाळे रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. दुकानातील साहित्य, फर्निचर व इतर व्यावसायिक सामान हलविण्याची लगबग परिसरात दिसून आली.
प्रशासनाकडून प्रत्यक्ष कारवाई होण्यापूर्वीच काही व्यावसायिकांनी स्वतःहून गाळे खाली करण्यास सुरुवात केल्याने परिसरातील हालचालींना वेग आला आहे.
पोलीस बंदोबस्त मिळाल्यास उद्याच कारवाई
निष्कासनाचे आदेश अंतिम असले तरी प्रत्यक्ष कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बुधवारी आवश्यक पोलीस संरक्षण उपलब्ध झाल्यास ५४ व्यावसायिक शेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असे मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे बोईसरमधील ५४ गाळ्यांवर बुधवारी प्रशासनाचा हातोडा पडणार का? की पोलीस बंदोबस्ताच्या उपलब्धतेनुसार कारवाईची तारीख पुढे ढकलली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, संभाव्य कारवाईपूर्वीच व्यावसायिकांकडून गाळे रिकामे करण्यास सुरुवात झाल्याने या प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळाले आहे.


0 Comments